लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सोमवारी आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडल्याने पोलिसांनी पटेलांसह कार्यकर्त्यांना अटक केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासूनच त्रिमूर्ती चौकात धरणे आंदोलन करीत होते. भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यातून आलेले शेकडो शेतकरी व कार्यकर्ते रणरणत्या उन्हात मंडपात बसून होते. शेतकरी, बेरोजगारांच्या न्यायासाठी आपण आंदोलन करीत आहोत, अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका खा. पटेल यांनी घेतली. मात्र, जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत याची माहिती तहसीलदार संजय पवार तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी दिली. त्यामुळे दुपारी ३.२५च्या सुमारास खा. पटेल मंडपातून उठून महामार्गावर आले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ रोखून धरला. तब्बल ४० मिनिटे ते कार्यकर्त्यांसोबत महामार्गावर बसून होते. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दुपारी ४च्या सुमारास पटेलांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे कर्जमुक्ती आंदोलन
By admin | Published: May 23, 2017 3:05 AM