- अतुल कुलकर्णी, नागपूरशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असे म्हणत गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. राष्ट्रवादीने मांडलेली वेगळी चूल लक्षात येताच काँग्रेसचे सदस्य धावपळ करत पायऱ्यांवर पोहोचले पण तोपर्यंत राष्ट्रवादीने आंदोलन गुंडाळून सभागृहात जाणे पसंत केले. विरोधकांमधील दुफळी समोर येऊ नये म्हणून कर्जमाफीच्या विषयावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी राज्यपालांना जाऊन भेटायचे आणि निवेदन देण्याचा निर्णय घेतला गेला. दुपारी कामकाज चालू असतानाच दोन्ही सभागृहातील प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला गेले. त्यावेळी विधानपरिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले,पण विधानसभेत कामकाज बंद पाडणे विरोधकांंना शक्य झाले नाही. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलायचे असतानाही बुधवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभात्याग करतो असे घोषित केले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील यांनाही बोलायचे होते. सभात्यागाची घोषणा झाल्यानंतर काहीवेळ राष्ट्रवादीचे नेते सभागृहात रेंगाळले मात्र शेवटी तेही नाईलाजाने बाहेर पडले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची नंतर वेगळी चर्चा झाली आणि सकाळी काँग्रेसला न घेता आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी सकाळीच पायऱ्यांवर बैठक मारत, घोषणाबाजी सुरु केली. या आंदोलनाची माहिती कळताच काँग्रेसचे नेते पायऱ्यांकडे गेले पण तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन अशा बातम्या सुरु झाल्या होत्या. पायऱ्यांवर जमलेल्या पत्रकारांकडे राष्ट्रवादीचे काही नेते कालच्या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत होते. विधानपरिषदेचे कामकाज पहा आणि विधानसभेतला विरोधी पक्ष नेत्यांचे काम पहा, तुम्हीच तुलना करा, असेही काही ज्येष्ठ सदस्य बोलून दाखवत होते. नंतर मात्र दोन्ही काँग्रेसचे सदस्य सदस्य राज्यपालांना जाऊन भेटले.
राष्ट्रवादीची वेगळी चूल
By admin | Published: December 18, 2015 2:42 AM