राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:43 PM2023-10-13T12:43:53+5:302023-10-13T12:44:42+5:30
शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. त्याला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली नव्हती.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज एकत्र सुनावणी घेण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते, अशी शक्यता विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी वर्तविली आहे.
शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. त्याला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली नव्हती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी सुरू आहे त्याला सुप्रिम कोर्ट स्थगिती देवू शकते, असे मत निकम यांनी व्यक्त केले.
अजित पवार गटाने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे, यावर बोलताना ॲड. उज्वल निकम यांना सांगितले की, दोन्ही याचिकांवर सुप्रीम कोर्ट आज काय पावले उचलते, हे पाहणे देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.
निवडणूक आयोगात काय सुरूय...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी भारतीय निवडणूक आयोगापुढे सुरू असलेली सुनावणी आता तब्बल एक महिन्यानंतर, ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा करताना अजित पवार गटाने ही सुनावणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.