ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 27 - बनावट कागदपत्रांच्या आधारे घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील करोडो रुपये किंमतीची १०८ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांना कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याप्रकरणी यापूर्वीच अशोक हिरे, पिल्लू मेहता, जी. पी. पाल आणि कासी गार्ड यांना अटक करण्यात आली आहे. पिलू परवेझ मेहता या महिलेला पिलूधन मेस्त्री असल्याचे भासवून मुंबई उच्च न्यायालय, ठाणे दिवाणी न्यायालय आणि ठाणे तहसिलदार यांची दिशाभूल करुन हा गैरव्यवहार करण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही हेराफेरी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यू स्वामी समर्थ कंपनीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मेहता यांनी जमीन आपलीच असून ती विकण्यासाठी अडथळे आणले जात असल्याचा दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी केलेल्या चौकशीत पिलू परवेझ मेहता, त्यांचा भाऊ कासी गार्ड, गिल्बर्ट मेंडोन्सा, त्याचा साथीदार अशोक हिरे आणि अॅड. जी. पी. लाल यांनी बोगस कागदपत्रे तयार करून जमिन बळकावण्याचा घाट घातल्याचे उघड झाले होते.
याप्रकरणी एप्रिल २०१६ मध्ये मेंडोन्सा यांच्यासह पाचही जणांच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मेंडोन्सा यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळला होता. पुन्हा नव्याने केलेला अर्जही ठाणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी मेंडोसा यांना अटक केली. याप्रकरणी यापूर्वीच अशोक हिरे सह चौघांना अटक केल्यामुळे यातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.