मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या प्रभादेवी येथील कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा रोखण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यालयाचे प्रवेशद्वारावरच ठाण मांडले होते. त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.‘सामना’तील अग्रलेखात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘सामना’ कार्यालयावर मोर्चा नेला होता. पण याची कुणकुण लागताच मोर्चा रोखण्यासाठी कार्यालयाजवळ आधीपासूनच शिवसैनिक जमले होते. पोलिसांचाही बंदोबस्त होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्चा जवळ येताच शिवसैनिकांनी सोडावॉटरच्या बाटल्या मोर्चेकरांच्या दिशेने भिरकावल्या. त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागेल, हा अंदाज घेत पोलिसांनी आणखी कुमक मागवली. तात्काळ दादर, वरळी पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. (प्रतिनिधी)
सेनेने रोखला राष्ट्रवादीचा मोर्चा
By admin | Published: June 12, 2014 4:25 AM