सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेश व सुरेश पारेख आणि अरविंद व ऋषिकेश लठ्ठा या चार बड्या व्यापाऱ्यांसह बियाणी या व्यापाऱ्यावर शुक्रवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकून तपासणी केली. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधीत बँक राजारामबापू पाटील सहकारी बँकेत कागदपत्रांची चौकशी केल्याने सांगलीत दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
शुक्रवारी सकाळी ईडीचे ६० अधिकारी ११ वाहनांतून शहरात दाखल झाले. प्रत्येक पथकात चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता, यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारेख आणि सुरेश पारेख या व्यापारी भावांचे शेजारीशेजारी बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे पुरवठादार आहेत. दोघांच्या घरांवर सकाळी ७ वाजता छापा टाकण्यात आला. घरात प्रवेश केल्यानंतर पथकांनी पारेख कुटुंबीयांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाचे शस्त्रधारी जवान बंगल्याबाहेर होते.
या व्यापाऱ्य़ांच्या दुकानातही जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. पथकांची काही वाहने उभी होती. तर काही दूर लावण्यात आली होती. न्यू प्राइड मल्टिप्लेक्स शेजारच्या व्यंकटेशनगरातील अरविंद आणि ऋषिकेशला या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवरही पथकांचे छापे पडले.
पथक मुक्कामाला मिरजेत?कारवाईबाबत गुप्तता आवश्यक असल्याने ईडीच्या पथकातील सदस्य मिरजेत उतरले होते. सकाळी सहानंतर सर्वजण सांगलीत दाखल झाले. त्यांनी थेट कारवाई केली. यावेळी यासोबत केंद्रीय राखीव दलाचे सशस्त्र जवान होते.
सांगली पोलिसांची सतर्कतासांगलीत रिलायन्स ज्वेल्सवर पोलीस असल्याची बतावणी करत दरोडा टाकण्यात आला होता. त्यामुळे ईडीचे पथक सांगलीत आल्याचे समजताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांचे पथक पाठवून खात्री करून घेतली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याबाहेर येत पोलिसांना माहिती दिली. प्रत्येक ठिकाणी चार ते पाच अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक तिथून निघून गेले. दुपारी दोनच्या दरम्यान वाहनांतून सर्व पथके निघून गेली. शहरात एकाचवेळी ईडीने छापा टाकल्याने नागरिकांनी घरांसमोर गर्दी केली होती.
'व्हॅट'मधील अनियमिततेची तपासणीजीएसटी करप्रणाली येण्याअगोदर सर्व व्यवहार 'व्हॅट'द्वारे होत असत. जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर 'व्हॅट'मधील गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष झाले होते. 'व्हॅट' वेळी झालेल्या व्यवहारांतील अनियमिततेबाबत व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
राजारामबापू बँकेच्या मुख्य कार्यालयातही चौकशीदरम्यान, राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या पेठ (ता. वाळवा) येथील मुख्य कार्यालयातही ईडीचे पथक दाखल झाले. सकाळी ११ वाजल्यापासून 'ईडी'च्या अधिकाऱ्यांकडून बँकेत चौकशी सुरु होती. सांगलीतील व्यापाऱ्यांवरील छापे प्रकरणाबाबत ही चौकशी असल्याची चर्चा होती.