सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे झाले गेले विसरुन जावे...पुढे-पुढे चालावे, असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आमदार व प्रमुख नेतेमंडळींना दिला.राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील आमदारांसह स्वत: खासदार उदयनराजे भोसले हेही उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना सोडून कुणालाही उमेदवारी द्या, अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार मंडळींची होती. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळत नसेल उदयनराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी केली होती.
त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीच्या सदस्यांनी तर उदयनराजेंना राष्ट्रवादीने तिकिट दिल्यास शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.खासदार पवार जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्य असेल असे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी या बैठकीतही स्पष्ट केले. त्यानुसार खा. पवार यांनी उदयनराजेंना पुन्हा झुकते माप दिले आहे. सर्व आमदारांनी लोकसभेला मागील सर्व विसरुन प्रचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच आमदारांनीही त्यांचा प्रचार करण्याचे मान्य केले.