पुणे: राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार असून काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या आमदारांनी प्रयत्न सुरु केले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचे मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहे.
अण्णा बनसोडे यांना तुम्हाला मंत्रिपद मिळेल का या प्रश्नावर माझे जाऊ द्या, अजित पवार हेच आमचे मुख्यमंत्री आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पहिली ठरली असून अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे हा निर्णय त्वरित झाला असल्याचे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अजित पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला तर वाटते, अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे. मात्र मला वाटून काय होणार. पक्षाचे सर्व निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतात. त्यांचा निर्णय माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार असल्याचे स्पष्ट केले होते.