राष्ट्रवादीची 'ही' खेळी काँग्रेसला पडणार भारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 03:51 PM2019-12-01T15:51:00+5:302019-12-01T15:51:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे.
मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोनच नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. हा पेच सुटला असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. इथेच राष्ट्रवादीची डाव साधला असून आगामी काळात हे काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते.
महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. काँग्रेसकडून शेतकरी नेते नाना पटोले अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षांऐवजी उपमुख्यमंत्रीपद हवं होतं. मात्र त्यांना विधानसभा अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्यात यश मिळवले आहे.
प्रसिद्धच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रीपद अत्यंत आवश्यक आहे. याचं महत्त्व राष्ट्रवादीला चांगलेच ठावूक होते. सरकारी जाहिरातीत प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पेपरवर दिसतो. त्यात विधानसभा अध्यक्षांना स्थान नसते. आता राष्ट्रवादीकडे हे पद गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांचा फोटो दिसणार आहे. यामुळे सर्वसामान्यांत हे सरकार केवळ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे का, असा संदेश जाण्याचा संभव आहे. याविषयी एक काँग्रेस नेत्याने नाराजी देखील दर्शविली होती.
एकूनच राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे.