अहमदनगर: संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते.
कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी रोहित पवार यांना विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कर्जत- जामखेड हा मतदासंघ का निवडला असा प्रश्न विचारला होता. यावर कर्जत-जामखडेमध्ये तीस वर्षापासून विकास नव्हता. त्यामुळे त्या मतदारसंघात विकास करण्याची संधी होती. तसेच कर्जत-जामखेडला मी विकासाचे मॉडेल तयार करायचे ठरविले होते. यासाठी मी कर्जत- जामखेड मतदारसंघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले की, कर्जत- जामखेड मधील जनता माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय झाला. तसेच तुम्ही ज्या वेळी निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असल्याचा भावनिक प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला कधीही हार मानायची नाही. कितीही मोठं आव्हान समोर असलं तरी झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करा, लोकांशी खोटं बोलू नका. लोकांच प्रामाणिकपणे काम केलं तर जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे राम शिंदे यांना रोहित पवारांनी पराभव केला होता. पवार घराण्यातील तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात सभा घेतली होती. यामध्ये तुम्ही राम शिंदे यांना निवडून दिलं तर त्यांना आणखी चांगलं कॅबिनेट देऊ तसेच कर्जत जामखेडमध्ये बाहेरून आलेले पार्सल परत पाठवा असं विधान केलं होतं. मात्र रोहित पवारांनी राम शिंदे यांना कडवी झुंज देत हा मतदारसंघ भाजपाकडून खेचून आणला होता.