पिंपरी : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी डावलल्याने माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक गणेश गायकवाड यांनीही अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचण वाढली आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे पक्षातील गटबाजी उघड झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दमछाक होणार आहे.भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत विलास लांडे यांना भाजपाकडून आवतन असतानाही त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. राष्ट्रवादीतील एका गटाने पक्षविरोधी काम केल्याने त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीतील गटबाजीचा फटका बसल्याची नाराजी लांडे यांनी थेरगाव येथील सभेत व्यक्त केली होती. गटबाजीमुळे पक्षाची वाट लागली आहे, आता तरी भानावर या, अशी आर्जव वरिष्ठ नेते शरद पवार यांना मेळाव्यात केली होती. त्याच वेळी महापौर शकुंतला धराडे यांचा कालावधी संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन अन्य कोणासही संधी द्या, अशी मागणी केली होती. महापौरपदासाठी इच्छुक असलेले उर्वरित दोन उमेदवार हे लक्ष्मण जगताप आणि लांडे गटाचे समर्थक असल्याने महापालिकेतील पक्षनेत्यांनी विरोध दर्शविला होता. निवडणुकीनंतर महापालिकेत समर्थकांची कोंडी होत आहे, पक्षनेतृत्वाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, महापालिकेत लांडे गट वरचढ ठरू नये, म्हणून महापौर न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात आमदारकीत पराभूत झाल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची ताकत वाढविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी लांडेंना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. दरम्यानच्या कालखंडात विधान परिषदेत विचार करू, असे आश्वासन मिळाल्याने लांडेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेतला होता. गेल्या वर्षभरापासून लांडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने अनिल भोसले यांची उमेदवारी जाहीर केल्याने लांडे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व आहे, तर भोसरी विधानसभा मतदारसंघात लांडे गटाचा प्रभाव आहे. शहरातील उमेदवाराचा विचार न झाल्याने राष्ट्रवादीत नाराजीचा सूर आहे. या दोन्ही गटांनी राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. चिंचवडला २२ हून अधिक राष्ट्रवादीचे नगरसेवक हे जगताप समर्थक आहेत, तर भोसरीत लांडे यांचेही शहरात तेवढेच नगरसेवक समर्थक आहेत. त्यामुळे शहरातील भाजप व शिवसेना युतीच्यास्थानिक नेत्यांनी लांडे यांच्याशी संपर्क साधून बंडखोरीसाठी समर्थन दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)>मतांचे विभाजन : लांडे समर्थक नाराज भाजपाकडून विधान परिषदेची आॅफर असतानाही केवळ राष्ट्रवादीवरील निष्ठेमुळे लांडे यांनी पक्ष सोडला नाही. पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून पुनवर्सन केले जाईल, अशी लांडे समर्थकांना आशा होती. लांडे यांना डावलल्याने बंडाचे निशाण फडकाविले आहे. राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असली, तरी महापालिकेत स्थानिक नेत्यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे भोसरी आणि चिंचवडमधील मतांचे विभाजन होणार आहे. अजित पवारांचा इशारालांडे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. ‘महापौरपद, आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली. बायकोला महापौर केले. त्यामुळे विलास लांडेंनी विधान परिषद निवडणुकीच्या भानगडीत पडू नये, अशी त्यांनी टीका केली आहे. मात्र, त्यावर भाष्य करण्याचे लांडे यांनी टाळले. पाच नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. तेव्हा किती उमेदवार अर्ज ठेवतात, त्यावरून चित्र स्पष्ट होणार आहे.
बंडखोरीने राष्ट्रवादीची कोंडी
By admin | Published: November 03, 2016 1:37 AM