राष्ट्रवादीची १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस, ४८ तासात उत्तर देण्यास सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:12 PM2023-07-14T20:12:38+5:302023-07-14T20:12:45+5:30
अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याप्रकरणी नोटीस.
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी ५ जुलै रोजी बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांपैकी १२ आमदारांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्या आमदारांना ४८ तासांचा अवधी देण्यात आला आहे.
शरद पवार यांनी ५ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची बैठक बोलवली होती. या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेतलेले नऊ आमदार वगळून सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. त्याच दिवशी अजित पवार यांनीही वांद्रे येथील एमआयटी येथे बैठक बोलवली होती. त्या बैठकीला राष्ट्रवादीचे काही आमदार गेले होते.
शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीत गैरहजर राहत, अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी १२ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
नोटीस पाठवलेले आमदार
- सुनील शेळके
- दिलीप बनकर
- नितीन पवार
- दीपक चव्हाण
- इंद्रनील नाईक
- यशवत माने
- शेखर निकम
- राजू कारेमोरे
- मनोहर चंद्रकपुरे
- संग्राम जगताप
- राजेश पाटील
- माणिकराव कोकाटे