- विलास बारीजळगाव : बहुचर्चित ठरलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपने तिकीट कापलेल्या एकनाथराव खडसे यांच्या कन्येविरुध्द असलेल्या राष्टÑवादी उमेदवाराला माघार घेण्यास सांगून सेना बंडखोराला पाठिंबा दिल्याने कलाटणी मिळाली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे तिकिट भाजपने ऐनवेळी नाकारले. त्यांनी सुचविलेल्या उमेदवाराला तिकिट देण्यात येईल असे पक्षाने कळविल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आले. इकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे गेल्यावेळी एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सुमारे ९ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्याने त्यांनी यावेळी बंडखोरी केली. खडसे यांची उमेदवारी कापली गेल्यामुळे विरोधकांनी देखील त्यांचा ‘अभिमन्यू’ करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरु केली. रोहिणी खडसे यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पुढे केले. राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांना माघार घ्यायला सांगून सेना बंडखोराला पुरस्कृत केले. पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी तो अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे सेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपतील नाराज गटाची त्यांना मदत होऊ शकते.जमेच्या बाजूराज्याचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत. सध्या जिल्हा बँकेत अध्यक्षा म्हणून काम करीत असल्याने राजकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. वहिनी रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. एकनाथ खडसे यांचे पक्षाने तिकीट कापल्याने काही प्रमाणात सहानुभूती आहे.सर्वसामान्यांच्या हितासाठी आंदोलक नेतृत्व आणि सामान्यांच्या कायम संपर्कातील आपला माणूस अशी प्रतिमा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड.रवींद्र पाटील व अपक्ष उमेदवार विनोद तराळ यांनी माघार घेतल्यामुळे मतविभाजन टळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात एकांगी झुंज सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.उणे बाजूमुक्ताईनगर मतदार संघात आतापर्यंत माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमदार म्हणून असल्याने अॅड.रोहिणी खडसे यांची ओळख त्यांची कन्या इतकीच आहे. काही वर्षांपासून त्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. मात्र थेट मतदारांपर्यंत त्यांचा संपर्क फार कमी आहे. ऐनवेळी त्यांचे नाव जाहीर झाल्यामुळे तयारी करण्यासाठी कमी वेळ मिळाला. राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवाराची माघार घेतल्याने सर्व विरोधक विरूद्ध भाजप असा सरळ सामना आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार झाल्याने काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते कितपत साथ देतात तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असले तरी माघार घेतलेले अॅड.रवींद्र पाटील व अपक्ष उमेदवार विनोद तराळ यांचा गट निवडणुकीत किती मदत करतो यासाऱ्यावर जय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.