दासू वैद्य, कवी, गीतकार -ना. धों. महानोर ! म्हणजे रानातला गंध शब्दांत पेरणारी प्रतिभावान नाममुद्रा. पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले महानोर कविता म्हणायला उभे राहिले की, अवघा रसिक संमोहित व्हायचा. अशा अनेक मैफली गावोगाव रंगवून महानोरांनी मराठी कविता तर सर्वदूर पोहोचवलीच; पण काव्य रसिकही घडवले. संत कवितेची मौखिक परंपरा पुढे नेणारा हा कवी लोकलयीत कविता गाताना ऐकणं हा एक लोभस अनुभव होता. महानोरांच्या शब्दांत आबादानी बहर उजागर झाला तशी असह्य ‘पानझड’ ही वेदना होऊन उजागर झाली. ‘रानातल्या कविता’ या पहिल्याच कवितासंग्रहाने महानोरांचे नाव ठळक झाले. लताबाईंची ‘आजोळची गाणी’, ‘जैत रे जैत’, ‘दोघी’, ‘एक होता विदूषक’ ते ‘जाऊद्या न बाळासाहेब’ चित्रपटातील गीतांनी गारुड केलं.
ज्या काळात दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती, त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता. त्याला कारण म्हणजे त्यांची लोकलयीतील कविता आहेच; पण त्याशिवाय महानोरांचा सर्वत्र असणारा संचार आणि लोकसंपर्क महत्त्वाचा ठरतो. महानोर ‘क्लास’चे कवी होते तसे ‘मास’चेही कवी होते. कविता लिहिता लिहिता कविता जगण्याचा रियाज शेवटपर्यंत त्यांनी सुरूच ठेवला. कविता त्यांचा ध्यास आणि श्वासही होता.
मसापच्या ‘प्रतिष्ठान’मध्ये माझ्या आठ कविता छापून आल्या होत्या. त्या कविता वाचून महानोरांनी पत्र पाठवले. ते मी जपून ठेवले आहे. महानोर यांनी माझ्याकडून सर्व कविता वाचायला म्हणून मागून घेतल्या आणि परस्परच पाॅप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळांकडे पोहोचविल्या आणि माझा ‘तूर्तास’ हा पहिला कवितासंग्रह २००३ साली प्रकाशित झाला.