Prof N D Patil Passes Away: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांची प्रकृती रविवारी बिघडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात ट्वीट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाटील यांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एन डी पाटील यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. 'महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटीलसाहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्व हरपले. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला. प्रा. एन. डी. पाटील हे निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केले. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केले. आमदार म्हणून काम केले. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे', अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले. माझे त्यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते. मा. प्रा. एन. डी. पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राने जन सामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे, असं ट्वीट करत जयंत पाटील यांनी एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.