पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील (एनडीए) २०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी सैनिकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या प्रशिक्षणार्थी सैनिकांना खडकी येथील कमांड रुग्णालय आणि सैनिकी रुग्णालयात उपचार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. दरम्यान, या सैनिकांना अपचनाचा त्रास झाल्याची माहिती एनडीएच्या वतीने देण्यात आली आहे. एनडीएमधील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी नाष्टा केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना पोटदुखी सुरू झाली. काही जणांना जुलाबही सुरू झाले. हीच परिस्थिती दुपारच्या जेवणावेळीही उद्भवल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. त्यांना तातडीने कमांड हॉस्पिटल व मिलिटरी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. अन्नामधून विषबाधा झाली की अपचनाचा त्रास झाला, याबाबत मात्र खात्रिशीर माहिती मिळू शकली नाही. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, एनडीएकडून अन्नपदार्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.काळजीचे कारण नाही : देवासियाएनडीएचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कमांडर शिबू देवासिया यांनी, आतापर्यंत २०० विद्यार्थ्यांना हा त्रास झालेला असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचे समजतात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आलेले आहे. अपचनामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला असून, विषबाधा झाली असे म्हणता येणार नाही. त्यांना देण्यात आलेल्या नाष्टा तसेच जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे देवासिया यांनी सांगितले.
एनडीएच्या २०० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: September 12, 2015 4:12 AM