कालच्या टी २० वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाने गमावलेला सामना खेचून आणला. या खेळीचे खुद्द शरद पवारांनी अद्भुत प्रकारचा चमत्कार असे वर्णन केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचे स्थान होते. हा इतिहास होता. आता भारतीय संघाने आपले स्थान प्रस्थापित केले असल्याचे पवार म्हणाले.
कालच्या सामन्यात थोडी चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू भारतीय संघाने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. T20 विश्व चषकाच्या स्वप्नांचा दुष्काळ काल संपला. आपल्या संघाचे कौतुक केले पाहिजे. राहुल द्रविडच्या रूपात आपल्याला उत्तम प्रशिक्षक मिळाला, असे पवार म्हणाले.
एनडीए खासदारांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्तांवर शरद पवारांनी असे काही माझ्या ऐकण्यात नाही. तसे कुणी आमच्याशी बोललेलेही नाही. संसद अधिवेशन खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होत आहे. पहिले अधिवेशन आहे, आताच काही कळणार नाही. दुसऱ्या सेशनपर्यंत याचा अंदाज येईल, असे पवार म्हणाले. कुठल्याही खासदाराला पुन्हा निवडणूक नकोय. निवडणुका कव्हर करायला तुम्हाला किती त्रास होतो तेवढाच त्रास उन्हाचा पावसाचा आम्हाला देखील होतो. त्यामुळे आता कुणालाच निवडणुका नको आहेत.
महाराष्ट्र हे २ नंबरचे कर्जबाजारी राज्य व राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे. आणि म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असे जाहीर केले. आता दिवस फार राहीले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, असेही पवार म्हणाले.
तसेच आषाढी वारीमध्ये सहभागी होणार असल्याच्या वृत्तावर पवार यांनी आपण पायी चालणार नसल्याचे स्पष्ट केले. पालखी ज्यावेळेस जाते त्यावेळी माझ्या गावातून जाते म्हणून पालखीचे स्वागत करण्यासाठी मी थांबणार आहे, असेही पवार म्हणाले.