ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.19 - नंदनवन पोलीस ठाण्यासमोर दिवसाढवळ्या एका युवतीचे ४० हजार रूपये लुटून नेण्यात आले. लुटारुंचा पाठलाग करतांना युवती बेशुद्ध झाली. गुरुवारी दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यासमोर घडलेल्या या घटनेने पोलिसांनाच आव्हान दिले असून पोलीस विभागही हादरला आहे.
२८ वर्षीय सोनी सहदेव पंडीत ही युवती जगनाडे चौकातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये काम करते. ती नंदनवन पोलीस ठाण्याजवळील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ राहते. तिच्याजवळ कोचिंग सेंटरचे ४० हजार रूपये होते. ती सकाळी १०.४५ वाजता बॅगेत रूपये ठेवून कोचिंग सेंटरला जाण्यासाठी घरून निघाली. कोचींग सेंटर जवळच असल्याने सोनी नेहमीच पायी ये-जा करायची. तिने रुपये असलेली बॅग खांद्याला लटकवली व ती निघाली. घरापासून काही दूर जाताच एका बाईकवर स्वार दोन युवक आले आणि त्यांनी तिची बॅग हिसकावून घेतली.
सोनीने हिमतीने आरोपींचा पाठलाग केला. काही दूर जाऊन ती बेशुद्ध पडली. रस्त्याने ये-जा करणारे नागरिक आरडाओरड ऐकूण तिच्याजवळ पोहोचले. त्यांनी नंदनवन पोलिसांना सूचना दिली आणि सोनीला परिसरातीलच रुग्णालयात दाखल केले. सोनी इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये कामाला लागली होती. कोचिंग सेंटरचे रूपये चोरी गेल्याने ती खूप चिंतेत होती. त्यामुळेच तिने लुटारुंचा पाठलाग केला. घटनास्थळापासून काही पावलांवरच नंदनवन पोलीस ठाणे आहे. या मार्गाने नेहमीच वर्दळ असते. अशा वेळी दिवसाढवळ्या महिलेला लुटणे अतिशय गंभीर आहे. घटनास्थळाजवळच नासुप्रचे मैदान आणि वाचनालय आहे. तिथे नेहमीच संशयास्पद युवक आढळून येतात. परिसरातील नागरिकांनीही याबाबत पोलिसात अनेकदा तक्रार केली आहे. वर्षभरापूर्वी येथील मंदिरातही चोरी झाली होती. ताजा घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.