मुंबई: मुंबई विद्यापीठाचा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. लॉच्या परीक्षेला बसणाऱ्या ६४ विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून नापास करण्यात आले होते. त्यापैकी ९० टक्के विद्यार्थी हे या परीक्षेत पास झाले आहेत. मुंबई विद्यापीठातील सिस्टीम मधील बिघाडामुळे हा प्रकार घडला होता. परीक्षा विभागाच्या चुकीचा फटका माटुंग्याच्या न्यू लॉ महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांना बसला होता. तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या केटी विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले होते. केटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अडीच महिन्यांपूर्वी झाली. पण, त्यांचा निकाल लावायला उशीर केला. आणि निकाल लागल्यावर ६४ विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. कारण, या निकालात हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात खेपा मारायला सुरुवात केली. हजर विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करता येत नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते. मात्र परीक्षा विभागाने तातडीने याबाबत कार्यवाही केल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हे विद्यार्थी पास झाल्यामुळे आता त्यांना मे मध्ये होणारी परीक्षा देता येणार आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून सांगण्यात आले की, कॉम्प्युटरमधील सिस्टीमध्ये बिघाड होता. त्यामुळे विद्यार्थी गैरहजर असल्याचे दाखवले. (प्रतिनिधी)
नापास केलेल्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी पास
By admin | Published: February 21, 2017 4:15 AM