अमरावती : नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. ज्ञान मिळविण्यासाठी सकारात्मक सातत्य व उजळणी आवश्यक आहे. चांगल्या विचाराचा सकारात्मक पाठपुरावा केल्याने नक्की यश मिळते, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित नवव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री यशोमती ठाकूर बोलत होत्या. राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शरद गोसावी, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, रवींद्र आंबेकर, सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्रिया देशमुख, प्राचार्य संजय खेरडे, राजकुमार अवसरे, शेखर पाटील आदी उपस्थित होते.इन्स्पायर्ड अवॉर्ड उपक्रमातून ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अनेक विद्यार्थी नवे संशोधन करून पेटंटही मिळवतात. अशा अभिनव आविष्कारांसाठी उद्योजकांकडून आर्थिक सहकार्य मिळवून देऊ, असे ना. ठाकूर म्हणाल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध अविष्कारांबद्दल कौतुक केले.-----------------अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला! समाजात महिलांवरील अत्याचार, मुलींच्या अंगावर अॅसिड फेकणे अशा अनेक अस्वस्थ करणाºया घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीत नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. ‘अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या. ---------------३४९ प्रतिकृतींचा समावेश राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात ३८४ विज्ञान प्रतिकृतींची निवड प्राथमिक स्तरावर झाली होती. ३७१ प्रतिकृतींची निवड प्रक्रियेतून झाली. त्यापैकी ३४९ प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. त्या डिजिटल इंडिया, क्लीन इंडिया, मेक इन इंडिया या संकल्पनेवर आधारित आहेत. १० फेब्रुवारीला प्रदर्शनाचा समारोप होईल. प्रदर्शनात मांडलेल्या १० टक्के प्रतिकृतींची निवड राष्ट्रीय पातळीवर केली जाणार आहे.
नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज- यशोमती ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 6:56 PM