लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्याआधीपासूनच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. मुंबईत स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईतील कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट दिली. शहरातील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णांची विचारपूस केली. या आढावा बैठकीस दिल्ली येथून आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाचे डॉ. संकेत कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.स्वाइन फ्लूवर तत्काळ उपाय केल्यास या रोगाचा प्रसार होण्यापासून अटकाव होऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा रुग्णाकडून उपचार उशिरा सुरू केले जातात. हे टाळण्यासाठी आणि स्वाइन फ्लूमुळे जाणाऱ्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी या आजाराबाबत लोकप्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्यशिक्षण अधिक प्रभावीपणे करण्यात यावे, खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, तसेच सर्वेक्षण अधिक प्रभावीरीत्या करण्यात यावे, असेदेखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.मुंबईतील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, १ जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत स्वाइन फ्लू आजाराचे २८५ रुग्ण आढळले असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृत्यूपैकी दोन तृतीयांश व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होते. तसेच मृतांपैकी तीन महिला गर्भवती होत्या.
स्वाइनविषयी जनजागृती आवश्यक-आरोग्यमंत्री
By admin | Published: June 28, 2017 3:45 AM