पुणे: पाणी, विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूके केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही. याची पूर्ण कल्पना राज्य शासनाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपासून शासनाने जलयुक्तशिवार योजनेच्या माध्यमातून २४ टीएमसी पाटीसाठी विकेंद्रीत स्वरुपात निर्माण केला आहे. उत्पादन होणा-या ठिकाणी कृषीप्रक्रिया उद्योग उभारण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तक प्रकाशन प्रकाशन समारंभात देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास गृहराज्य मंत्री राम शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख, चित्रपट निर्माते कैलास वाणी आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्यांकडे पाहून सजामाने व राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. शेतक-यांना व्यवस्थेचे बळी ठरविले जाते. पांढ-या कपड्यातील दरोडेखोर शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी.खोत म्हणाले, शेतक-यांच्या बांधावर उभे राहून त्यांच्या आपण सर्व त्यांच्या बरोबर आहोत,असा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. देशमुख म्हणाले, शेतक-यांचे प्रश्न, समस्या, दुख:, खोत यांनी आपल्या पुस्तकातून सक्षमपणे मांडले आहेत.त्याचे पुस्तक म्हणजे जीवंत असणा-या व्यक्तींचे जीवन मांडणारी एक कांबरीच आहे. (प्रतिनिधी)
शाश्वत शेतीसाठी पायाभूत गुंतवणूक हवी
By admin | Published: January 04, 2016 12:51 AM