पुणे : सध्या संपूर्ण जगात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित १४२व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात जावडेकर शुक्रवारी बोलत होते. दीपक टिळक व्यासपीठावर होते.जावडेकर म्हणाले, ‘‘हवामानबदलाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक विकसित देशाची जबाबदारी असून देशानुसार ती बदलते. अनेक लोक आजही हवामानात झालेले बदल मान्य करायला तयार नाहीत. अनेक दिवसांपासून दुष्काळ, पूरस्थिती, सागरपातळीतील वाढ या गोष्टींची तीव्रता वाढत आहे.’’कार्बनडाय आॅक्सइड कमीत कमी प्रमाणात निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी प्रत्येक देशाने वाहनांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कारखाने आणि कोळशापासून होणारी निर्मिती कमी करायला हवी. येत्या काळात वातावरणाची लढाई उत्तमरीतीने लढू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या शहरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यातही प्रत्येकांनी आपल्या स्तरावर वीज, पाण्याची बचत आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयात काम करायला हवे, असे जावडेकर म्हणाले.
हवामानबदलाचा एकत्रित सामना गरजेचा : जावडेकर
By admin | Published: May 21, 2016 12:56 AM