ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - देशाला सक्तीच्या कुटुंब नियोजनाची व लोकसंख्यावाढीस आळा घालण्याची गरज असल्याचे सांगत संघाच्या शिलेदारांनी ‘स्वकीय’ सरकारवर दबाव वाढवून सर्वधर्मीयांसाठी सक्तीचे कुटुंब नियोजन लादायला हवे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या देशाला लोकपालापेक्षा सगळ्यात जास्त या समान नागरी कायद्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत देश वाचण्याचा हाच एकमेव तोडगा असल्याचेही त्यांनी 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. मुसलमानांची लोकसंख्या वाढल्याने देशाचा भाषिक, भौगोलिक व भावनिक समतोल बिघडेल व त्यामुळे देशाच्या एकात्मतेस तडे जातील याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा असे सांगत मुसलमानांनी देशाचा कायदा पाळावा, कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा हे देशाच्या पंतप्रधानांनी ठणकावून सांगण्याची हीच वेळ आहे, असेही उद्धव यांनी लेखात म्हटले आहे.
संघाच्या घरवापसी मोहिमेवरही या लेखात भाष्य करण्यात आले. आहे. या देशात मुसलमान वाढत असून त्या सगळ्यात हिंदू संस्कृती व राष्ट्रवाद मात्र मार खात आहे. ‘घरवापसी’ वगैरे प्रयोग ज्यांना करायचे आहेत त्यांना आपला विरोध नसल्याचे सांगतानाच इस्लामी आक्रमण रोखण्याचा हा उपाय नाही, हे उपाय म्हणजे आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असा प्रकार असल्याचेही त्यांनी लेखात नमूद केले आहे. लोकसंख्या वाढणे जर मुस्लिम भूषणावह मानणार असतील व तेच त्यांचे गर्वाचे कारण असेल तर समस्त मानवजातीसाठी हे लोकसंख्येचे आक्रमण विनाशकारी ठरेल, असा इशाराही लेखात देण्यात आला आहे.
मोदी सरकारने देशातील मुसलमानांच्या दारावर ‘खट खट’ करून हे सत्य सांगायला हवे. पण आजचे सरकारही पूर्वीच्या सरकारांप्रमाणेच निधर्मी भूमिका घेत असल्याने असे काही घडू शकेल काय?असा प्रश्नही उद्धव यांनी विचारला आहे. प्रखर हिंदुत्ववाद जपणार्या शिवसेनेचे राज्य येईल तेव्हाच नवा इतिहास घडवला जाईल व इतिहासाच्या पुस्तकांतील जीर्ण पाने नव्याने लिहिली जातील, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे :
- हिंदुस्थानात मुस्लिमांची संख्या वाढते आहे व यापुढेदेखील ती वाढतच राहणार अशा बातम्यांत आता आश्चर्य वाटावे असे काय आहे? पण तरीही मुसलमानांचा आकडा फुगत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात व समस्त हिंदू ‘आम्हाला काय त्याचे?’ असे मानून त्या नजरेआड करीत असतो. देशातील मुस्लिमांची संख्या २००१ ते २०११ या दशकभराच्या काळात २४ टक्क्यांनी वाढल्याचे जनगणनेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हे आकडे २०११ सालापर्यंतचे आहेत व आता २०१५ साल सुरू आहे. म्हणजे मागच्या पाच वर्षांत हा आकडा आणखीन पाच-दहा टक्क्यांनी नक्कीच वाढला असणार. पाकिस्तानसारख्या राष्ट्रात मुसलमानांची संख्या वाढत नाही त्यापेक्षा जास्त वेगाने आपल्याकडे मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे व मुसलमानी लोकसंख्या याच ‘बुलेट ट्रेन’ वेगाने वाढत राहिली तर पुढच्या पंचवीस वर्षांत या देशात लोकसंख्येच्या बळावर आणखी एका पाकिस्तानच्या मागणीस बळ मिळेल.
- मुसलमानांचा सर्वात जास्त ‘टक्का’ आसाममध्ये वाढला आहे. कारण तेथील अनेक जिल्ह्यांत बांगलादेशी मोठ्या संख्येने घुसल्याने किमान सात जिल्ह्यांचे ‘इस्लामीकरण’ झाले आहे. पण केरळ, गोवा, हरयाणा, दिल्लीसारख्या राज्यांतही मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मणिपुरात मुसलमानांची लोकसंख्या घटली आहे. मेघालय, ओडिशा, अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यांत या मुस्लिम लोकसंख्येच्या ‘बुलेट ट्रेन’ला ब्रेक लागला आहे. पण ही राज्ये लहान आहेत व येथील प्रांतीय व धार्मिक राजकारण वेगळे आहे. यापैकी अनेक राज्यांत मुस्लिम लांगूलचालनाचे राजकारण चालत नाही. पण मोठी राज्ये ज्या पद्धतीने हे लांगूलचालन करीत आहेत त्यामुळे ‘हिंदू राष्ट्र’ असूनही हिंदू लोकसंख्या मागे हटली आहे.
- मुसलमानांची लोकसंख्या वाढल्याने देशाचा भाषिक, भौगोलिक व भावनिक समतोल बिघडेल व त्यामुळे देशाच्या एकात्मतेस तडे जातील याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा. मुसलमानांनी देशाचा कायदा पाळावा, कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा हे देशाच्या पंतप्रधानांनी ठणकावून सांगण्याची हीच वेळ आहे. मनमोहन यांनी जी चूक केली तीच चूक विद्यमान पंतप्रधानांनी करू नये. देशाला सक्तीच्या कुटुंब नियोजनाची व लोकसंख्यावाढीस आळा घालण्याची गरज आहे.
- मुसलमानांची लोकसंख्या वाढते म्हणून हिंदूंनीदेखील पोरांचे लटांबर वाढवून लोकसंख्या वाढवावी हा त्यावरचा उपाय नाही. संघाच्या शिलेदारांनी ‘स्वकीय’ सरकारवर दबाव वाढवून सर्वधर्मीयांसाठी सक्तीचे कुटुंब नियोजन लादायला हवे. या देशाला लोकपालापेक्षा सगळ्यात जास्त या समान नागरी कायद्याची गरज आहे व देश वाचविण्याचा हाच एकमेव तोडगा आहे.
- हिंदुस्थानातील धर्मांध मुसलमान या देशाचा नागरिक म्हणून नव्हे तर मुसलमान म्हणून जगतात. हे चुकीचे आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत असे जर येथील मुस्लिमांनी मानले तर नागरिक म्हणून देशहिताचे कायदे त्यांनीही पाळायलाच हवेत.
- लोकसंख्या वाढणे जर मुस्लिम भूषणावह मानणार असतील व तेच त्यांचे गर्वाचे कारण असेल तर समस्त मानवजातीसाठी हे लोकसंख्येचे आक्रमण विनाशकारी ठरेल. पाकिस्तानात इस्लामी राजवट आहे. इराकसारख्या इतर अनेक राष्ट्रांत इस्लामी राजवटी आहेत, पण तेथील मानव जातीस व राष्ट्रांना प्रतिष्ठा मिळू शकलेली नाही. महिला गुलाम व पोरे बेवारस आहेत. याउलट आधुनिकतेची कास धरणारी तुर्कस्तानसारखी मुसलमानी राष्ट्रे ‘युरोप’, ‘अमेरिके’च्या स्पर्धेत पुढे आहेत. मोदी सरकारने देशातील मुसलमानांच्या दारावर ‘खट खट’ करून हे सत्य सांगायला हवे.