नेत्यांची गळती : स्थानिक नेत्यांविनाच निवडणुकीला सामोरेराजेश जवंजाळ - अमरावतीकाँग्रेसची विचारधारा रूजलेल्या अमरावती जिल्ह््यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे रोवण्यासाठी ज्यांनी जिकरीचे प्रयत्न केलेत, त्या नेत्यांनीच आता राष्ट्रवादीला रामराम ठोकणे सुरू केले आहे. पक्षाच्या महत्त्वपूर्ण चेहऱ्यांना लागलेल्या गळतीची कारणे शोधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीला चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरात राष्ट्रवादीची पाळेमुळे रोवण्यासाठी माजी प्रदेश सरचिटणीस संजय खोडके आणि सुरेखा ठाकरे यांचे मोलाचे योगदान राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने अमरावतीची उमेदवारी दिल्याने खोडकेंनी पक्षविरोधी मोर्चा उभा केला. संजय खोडके यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. परिणामी संजय खोडके यांना राष्ट्रवादीतून निष्कासित करण्यात आले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारीदेखील पक्षातून बाहेर पडलेत. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांच्याशी व्यक्तिगत संबंध असणाऱ्यांपैकी खोडके व ठाकरे आहेत. संस्कृतिसंपन्न असलेल्या अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या या बंडासाठी पक्षनेतृत्वाने केलेला अन्याय हेच प्रमुख कारण दिले जाते. धनगर समाजाच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनीही पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्याची माहिती आहे. आता मोर्शी-तिवसा मतदारसंघ वगळता एकाही मतदारसंघात राष्ट्रवादीचा दमदार चेहरा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे हे पक्षात नवखे आहेत. ते लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीच्या संपर्कात आले. ज्या नवनीत राणांना पक्षाने सन्मान दिला त्या नवनीत राणांनी दर्यापुरातून निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातर्फे झाला; तथापि नवनीत यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक विधानसभा मतदारसंघांत चेहरे नसल्याचा लाजीरवाणा प्रसंग ओढवला आहे. (प्रतिनिधी
राष्ट्रवादीला चिंतनाची गरज
By admin | Published: September 28, 2014 1:00 AM