विशाल सोनटक्के / उस्मानाबादकलाकृती विरंगुळा, मनोरंजनाचे काम करीत असतात. त्यामुळेच याकडे अनेकांचा ओढा असतो. मात्र एकूण परिस्थिती पाहता प्रबोधनात्मक कलाकृती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी व्यक्त केले. उस्मानाबादेत रसिकांनी दिलेला प्रतिसाद अविस्मरणीय होता असे सांगत येथील रसिकप्रेक्षकांचाही त्यांनी गौरव केला.जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित केलेल्या ९७व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचा रविवारी रात्री समारोप झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बागडे बोलत होते. मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, खा. रवींद्र गायकवाड, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, मुख्य कार्यवाहक दीपक करंजीकर व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.वि. वा. शिरवाडकरांनी ‘नटसम्राट’ रंगमंचावर आणले. या नाटकाने घरातील कौटुंबिक संघर्ष आणि कलह समाजासमोर मांडला. रामगणेश गडकरींनी ‘एकच प्याला’ नाटक लिहिले. ‘नटसम्राट’ नाटकानंतर समाजात वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली दिसते. तीच बाब ‘एकच प्याला’ची. या नाटकातून विदारक परिस्थिती मांडल्यानंतरही ‘प्याला’ घेण्याचे कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे कलाकृती पाहताना त्या मागची भूमिकाही समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे हरिभाऊ बागडे म्हणाले.प्रारंभी दिलीप कांबळे यांचे भाषण झाले. समारोप कार्यक्रमात उस्मानाबादचा दुष्काळी जिल्हा असा वारंवार उल्लेख येत होता. याकडे लक्ष वेधत आता हा जिल्हा फार काळ दुष्काळी म्हणून राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचे चित्र बदलण्याचा निर्धार केला असून, जलयुक्तची कामे ही त्याचाच भाग असल्याचे कांबळे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रबोधनात्मक कलाकृती वाढविण्याची आवश्यकता
By admin | Published: April 24, 2017 3:12 AM