नाशिक - शेतकरी एकत्र येत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत कृषी उत्पादन वाढवत आहे. कृषी उत्पादक विपणन कंपन्यांचे माध्यमातून कृषी मालाची विक्रीही वाढत आहे, मात्र हे करत असताना सर्वांनाच विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे शेतक-यांनी स्थापन केलेल्या कृषी माल आणि प्रक्रि या कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन केले. पवारांना असलेल्या आधुनिक शेतीच्या अद्ययावत ज्ञानाबद्दल येथील तज्ज्ञ आणि शेतकरीही अवाक झाले.कादवाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. पवार यांनी दौर्यात सह्याद्री फार्म येथे शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. वाघाड पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून वाघाड लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वाघाड धरणातील पाण्याचे स्वयंस्फूर्तीने व्यवस्थापन करून आणि आधुनिक शेतीची कास धरल्याने हा परिसर आता सुजलाम सुफलाम बनला आहे.तर सह्याद्री फार्मच्या माध्यमातून येथील शेतक-यांनी कुठल्याही दलाल आणि व्यापा-यांशिवाय स्वत:च शेतमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग सुरू केले असून देशातील इतर शेतक-यांसाठी शेतीचे हे स्वयंपूर्ण मॉडेल आदर्शवत ठरत आहेत. याची पाहणी शरद पवार यांनी करत येथील शेतकर्यांच्या संघिटत प्रयत्नांचे कौतुक केले. सह्याद्री फार्म वर अद्याक्ष विलास शिंदे यांनी स्वागत करत उपक्रमाची माहिती दिली. शरद पवार यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून घेत अगदी तंत्रशुद्ध माहिती देत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सरकारवर कोणतीही राजकीय टिकाटिपण्णी न करता शेतक-यांनी संघटित येत करायची वाटचाल यावर भाष्य केले.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फलोत्पादन संस्था स्थापण्याची गरज - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 2:33 PM