पुणे : राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन आपण सर्व मानव एक आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढत आहोत, असे चित्र जगभर उभे राहिले पाहिजे, असे सांगत हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी सोमवारी केले.जन सहयोग ट्रस्ट आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित विचारवेध संमेलनात ‘जागतिक संदर्भात राष्ट्रवाद : राष्ट्रवादाच्या भावी दिशा, बीज मांडणी’ या विषयावर डॉ. गणेशदेवी बोलत होते. डॉ. एन. पी. रमेश्वरम, दत्ता देसाई, संजीव चांदोरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपभोग घेणे सुरू असल्याने आपण विनाशाच्या दिशेने जात आहोत. तर दुसरीकडे विकासाच्या कल्पना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण जगात हे केवळ दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन पयार्याच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय शोधावा लागणार आहे. त्यासाठी पृथ्वीतलावरील आपण सर्व मानव एक आहोत, यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परमेश्वरम म्हणाले, उद्विग्न होऊन पराकोटीच्या राष्ट्रवादाचा विचार करणे, ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नुकसानकारक गोष्ट आहे. त्यामुळे नकळत आपल्या देशाच्या आजूबाजूला असणाऱ्या देशांशी वैरत्व पत्कारावे लागते. देशाच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. आपल्यासारख्या देशाला हे परवडणारे नाही. (प्रतिनिधी)
हुकुमशाहीच्या विरोधासाठी निर्भयतेची गरज
By admin | Published: January 24, 2017 3:41 AM