- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - चांगल्या लेखकाची विचारसरणी विचारसरणीशी नसली पाहिजे. ती सृजनाशी असायला हवी. बांधिलकीच ठेवायची असेल तर ती सृजनाच्या वाटा मोकळ्या करणारी असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत प्रसिध्द प्रसिध्द अनुवादक, समीक्षक प्रा. निशिकांत ठकार यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. ठकार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सुशीला आबुटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार, संमलनाचे प्रमुख दत्ता गायकवाड, प्रतिष्ठानचे सदस्य प्रा. विलास बेत, बाबुराव मैंदर्गीकर, कवी अविनाश बनसोडे मंचावर होते.
प्रा. ठकार म्हणाले, साहित्य आणि जीवनातही आपण नेहमीच नव्याचे शोध घेत असतो. मराठी साहित्यात नवीन काय आहे, याचा शोध घेताना जुने सर्वच टाकाऊ नसते, याचे भान ठेवले पाहिजे. जुन्यातूनच नव्या वाटा मिळू शकतात. साहित्यामध्ये नेहमीच बांधिलकीची चर्चा होते. हल्ली ती सर्वांनाच मान्य असल्यामुळे तिची फारसा विचार होत नाही; पण बांधिलकीमुळे साहित्याच्या वाटा चाकोरीच्या होतात. चांगल्या लेखकाची बांधिलकी विचारसरणीशी असली पाहिजे; तरच नवीन वाटा सापडतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नवीन वाटा बंद करून चालणार नाही, तसे झाल्यास मोठे नुकसान होईल. सध्या सर्वच व्यवस्थेत आपत्ती निवारण्याचे काम सुरू आहे. सांस्कृतिक जीवनातही आपत्ती येतात; पण साहित्य हा मानवी संस्कृतीतील संकटकालीन मार्ग आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर आबुटे म्हणाल्या, साहित्यामुळे नेहमीच जीवनाला ऊर्जा मिळते. त्यामुळेच सर्वांनी साहित्याशी मैत्री केली पाहिजे. सोलापूर स्मार्ट होऊ पाहात आहे. स्मार्ट सिटीमध्ये हे स्मार्ट संमेलन आयोजित केले आहे. प्रारंभी प्रा. बेत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ममता बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले. मैंदर्गीकर यांनी आभार मानले.
भाषा आणि ज्ञानभाषा
भाषा अभिजात झाली तरच ती ज्ञानभाषा होईल काय? असा प्रश्न उपस्थित करून प्रा. निशिकांत ठकार म्हणाले, भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. भाषांमध्ये निर्माण होणारे साहित्य ज्ञानभाषेसाठी जमीन तयार करण्याचे काम करते, असेही ते म्हणाले.