ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी दि.15 - एकीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान करून चर्चेत असताना दुसरीकडे कृषी व फलोत्पादन पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्याला सन्मान देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती हा देशाचा आर्थिक कणा आहे, त्यामुळे कणा मजबूत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. राजापूर तालुक्यातील परुळे येथे उन्नत शेती व समृध्द शेतकरी अभियान व सेंद्रीय शेती गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, परुळे हे गाव सेंद्रीय गाव म्हणून राज्यात नावारुपाला येत आहे. सेंद्रीय खतांचा वापराने करण्यात येणारी शेती आरोग्याला अपायकारक नसून सर्वसामान्य जनतेला विषमुक्त करणारी आहे. अशा पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सेंद्रीय पध्दतीने शेती करणाऱ्या गावांना देखील सेंद्रीय गाव म्हणून गौरविण्यात येईल, असे ते म्हणाले.
खोत म्हणाले शेतकऱ्याच्या कष्टामुळे पिके व धान्ये निर्माण होत असल्याने त्यांना योग्य तो सन्मान देणे गरजेचे आहे. शेती ही शेताच्या बांधावर जाऊन करावी लागते त्यामुळे शेतीविषयक नियोजन देखील चारभिंतीच्या आत करता येणार नाही. यापुढे कृषी अधिकारी तसेच शेती शास्त्रज्ञ हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. सेंद्रीय खतापासून तयार होणाऱ्या सेंद्रीय शेतमालाला शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पात्र शेतकऱ्यांना बियाणे, खत, किटकनाशके, अवजारे अनुदानातून देण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मातीपुजन व भात प्रात्याक्षिक :-
माती आपले रक्त गोठवून आपल्याला धान्य, फळ, कडधान्य देते त्यामुळे तिची कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे आणि आपण तिची पुजा करुन ते व्यक्त करत असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सेंद्रीय खत वापरुन भात प्रात्याक्षिक करण्यात आले.
फळबाग लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन सदाभाऊ खोत यांच्या हस्ते राजापूर तालुक्यातील परुळे येथे करण्यात आले. या योजनेतंर्गत एका मंडळामध्ये पाच गावे निवडून ज्या गावामध्ये जे फळपिक चांगले येईल अशा फळांची दोन हेक्टर जागेमध्ये प्रत्येक गावातून लागवड करण्यात येईल असे उपविभागीय कृषि अधिकारी शहा यांनी सांगितले.
आंबा साका स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन :-
रत्नागिरीतील माळनाका येथील उमेश लांजेकर सुविधा केंद्र येथे आंबा साका स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी त्यांनी आंबा साका स्कॅनिंग मशीनची पाहणी व प्रात्याक्षिक केले.
तुळसवडे गावाला सदिच्छा भेट :-
सदाभाऊ खोत यांनी राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावाला सदिच्छा भेट दिली. यावेळी तेथील ग्रामस्थांकडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची मिरवणुक काढून नंतर जाहीर सत्कार करण्यात आला.
आढावा बैठक :-
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री यांचेसमवेत पाणी टंचाई, जलयुक्त शिवार व खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. तसेच कृषी विभागा अंतर्गत असलेल्या "उन्नत शेती : समृद्ध शेतकरी" अभियानाचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अधिकार्यांना फक्त कागदी घोडे न नाचवता स्वतः फिल्डवर उतरुण काम करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हातील सर्व आमदार, जि.प. सदस्य व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.