पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आधार घेऊन नवीन मांडणी करायला हवी, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. तर ‘अहिसहिष्णूता वाढीस लागली आहे. जुण्या लोकांनी केलेले काम पुसण्याचे काम केले जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण स्मृती दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यशवंत वेणू सन्मानाने गौरविण्यात आले. व्यासपीठावर डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. यावेळी मोदी सरकारचे नाव न घेता भाई वैद्य आणि शिंदे यांनी असहिष्णूतेच्या विषयावर भाष्य केले.
भाई वैद्य म्हणाले, ‘‘मी समाजवादी विचारांचा आणि काँग्रेसविषयी कसा काय बोलतो आहे, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पंरतु मी १९४६ मध्ये काँग्रेसचा काही काळ सदस्य होतो. त्यांनतर १९४८ नंतर समाजवादी विचारांचा पुरस्कर्ता झालो. आजची परिस्थिती पाहता वित्तीय भांडवलशाही उदयास येत आहे., काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. त्यासाठी सुशीलकुमार यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेती आणि औद्योगिकरण विकासाचा मुद्दा यशवंतरांवानी मांडला होता. या विचारांचा पुरस्कार काँग्रेसने केला नाही. विचार या यशवंतरावांच्या विचाराची कास धरून औद्योगिकधोरण आणि शेतीला महत्त्व देऊन विकास साधता येणे शक्य आहे. काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.’’
असहिष्णूतेच्या मुद्यांवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘कांग्रेस जुन्या विचाराने चालून भाजपाशी सामना करू शकणार नाही. सहिष्णु म्हणून आपल्या राज्याची असलेली ओळख आहे. समता, समानता, सहिष्णु अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढत आहे.’’