ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णासोबतच त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. कर्करोगाचे सर्वात मोठे कारण तंबाखू आहे. म्हणूनच राज्यात त्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कॅन्सरला कॅन्सल करायचे असेल तर एकत्रित लढ्याची गरज आहे. या रोगाच्या जनजागृतीसाठी ह्यमाऊथ पब्लिसिटी फार फायद्याची ठरू शकेल. म्हणूनच कर्करोगाविषयी आपण संवाद साधणे सुरू केल्यास याचा नक्कीच फायदा होईल, असे मत आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी येथे व्यक्त केले. कॅन्सरला कॅन्सल करा या ब्रीदवाक्याला घेऊन ह्यलोकमतह्ण आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटरह्णतर्फे आयोजित एक जीवन स्वस्थ जीवन या दहा दिवसांच्या उपक्रमाची बुधवारी नागपुरात सांगता झाली. यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटर च्या अध्यक्षा टिना अंबानी, प्रसिद्ध सिनेअभिनेता इमरान हाश्मी व लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्ड चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक व नागपूर आदी ठिकाणी जाऊन कर्करोगाविषयी माहिती देऊन, लोकांशी संवाद साधत जनजागृती करण्यात आली.
डॉ. दीपक सावंत म्हणाले, प्रसिद्ध सिनेअभिनेता इमरान हाश्मी हे आपल्या लोकप्रियतेचा वापर कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीमधून लोकमतने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा फायदा रुग्णांसोबतच समाजाला होईल. नागपुरात केवळ विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून कर्करोगाचे रुग्ण येतात. त्यांच्या अद्यावत उपचारासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टर्शरी कॅन्सर सेंटर सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी ४५ कोटी रुपये उपपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. याला गंभीरतेने घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेषत: मुखकर्करोग व स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने आपल्या १० टक्के राखीव खाटा कर्करोगपीडित गरीब रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून द्याव्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
देशाने, राज्याने व समाजाने आम्हाला बरेच काही दिले. कर्करोगाबाबत जागृती करणे यात प्रसिद्धीचा कुठलाही हव्यास नाही. समाजाने दिलेल्या प्रेमाच्या ऋ़़णाची परतफेड करणे हेच सेवेमागील उद्दिष्ट आहे. ८० टक्के प्रकरणांत लवकर निदान झाले तर कर्करोगावर प्रभावी उपचार करणे शक्य असते. त्यामुळे जनजागृतीवर आम्ही भर देत आहोत, असे प्रतिपादन टिना अंबानी यांनी केले. कर्करोग म्हणजे अंत असे होत नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि कुटुंबीयांचा आधार असल्यास अखेरच्या टप्प्यातील व्यक्तीदेखील ठणठणीत बरी होऊ शकते. कर्करोगाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनावर भर देण्याची गरज आहे, असे मत इमरान हाश्मी यांनी व्यक्त केले. इमरान हाश्मी यांचा मुलगा अयान याला कर्करोग झाला होता. त्याच्या लढ्याविषयी त्यांनी भाष्य केले.या कार्यक्रमात कर्करोगाविषयी सविस्तर माहिती, त्यावरील अद्ययावत उपचार, नवे तंत्रज्ञान, गैरसमज व सध्याची स्थिती यावर वैद्यकीय तज्ज्ञ तसेच समाजसेवकांनी परिसंवादातून प्रकाश टाकला.राज्यात तंबाखूबंदी हवी
राज्यात इतर कर्करोगाच्या तुलनेत मुख कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. याला तंबाखू हे मुख्य कारण आहे. यासाठी मुंबईत तंबाखूवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. विरोध असतानाही सुट्या सिगारेटवर बंदी आणण्याचा कठोर निर्णय घेण्यात आल्याने काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, वाढत्या मुखकर्करोगाच्या रुग्णांची संख्या पाहता राज्यात तंबाखूवर कायद्याने बंदी आणणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात मी पुढाकार घेतो. केंद्रात विजय दर्डांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादनही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे केले.