क-हाड (जि.सातारा) : कावेरी प्राधिकरणाच्या धर्तीवर कोयना व अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. त्यात राजकीय हस्तक्षेप न करता फक्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करावा. याबाबत सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही धरणांतील पाणी सोडण्याच्या प्रश्नी योग्य नियोजन केले जाऊ शकेल आणि अशा प्रकारच्या पुराच्या संकटाचा सामना करता येईल, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात जी पुराची आपत्ती आली, त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे शासकीय यंत्रणेकडून मदत करण्याबाबत सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले. अशी पूर परिस्थिती जर विदर्भात निर्माण झाली असती तर सरकार असे वागले असते का? असा सवाल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.चव्हाण म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती कमी करण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. येथील पुरामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी सांगली जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करताना अत्यंत लाजीरवाणे वर्तन केले आहे. तर मदत व पुनर्वसन मंत्रीही उशिराने पोहोचले. अशा मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. एकीकडे मुख्यमंत्री पुराचे कोणीही राजकारण करू नका, असे बोलत आहेत. तर दुसरीकडे पूरग्रस्तांना केल्या जाणाºया शासकीय धान्यांच्या पिशव्यांवर स्वत:चे फोटो लावले जात आहेत. याची सखोल चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोयना-अलमट्टी प्राधिकरण करावे- पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:09 AM