लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉर्नियाच्या दोषांमुळे जगभरात १.१ कोटी व्यक्तींना अंधत्व आलेले आहे. यापैकी ३८ लाख अंध व्यक्ती भारतात आहेत, यातील २३ लाख बालके आहेत. डोळ्यातील नेत्रभिंग, दृष्टीपटल वा रेटिना हे महत्त्वाचे भाग व्यवस्थित असूनही केवळ नेत्रपटल अपारदर्शक झाल्याने व्यक्तीला अंधत्व येते. अशा व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तीचा कॉर्निया बसवल्यास दृष्टी परत प्राप्त होऊ शकते. नेत्रदानाचे म्हणूनच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. नेत्रदान हे मरणोत्तर केले जाते. आज देशात २० हजार व्यक्ती नेत्रदान करतात व त्यापैकी महाराष्ट्रातील दाते केवळ दोन हजार आहेत. यावरून नेत्रदानाची गरज व प्रत्यक्ष नेत्रदान यात प्रचंड तफावत असल्याचे लक्षात येईल. त्यामुळे ‘जागतिक दृष्टिदान दिना’च्या निमित्ताने नेत्रदानाविषयी कृतिशील जागरूकतेची गरज निर्माण झाली आहे.नेत्रदान करणे तसे अवघड नाही. मृत्यूपूर्वी व्यक्तीने तशी इच्छा जवळच्या नातेवाइकांना बोलून दाखवायला हवी किंवा तसा संमतीचा अर्ज नेत्रपेढीकडे भरून द्यायला हवा. जिवंतपणी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून तसे संमतीपत्र भरून दिले असले तरी व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षात नेत्रदान यशस्वी होण्यासाठी जवळच्या नातेवाइकांची इच्छा, तसेच प्रयत्न अतिशय मोलाचे ठरतात. मृत्यूनंतर चार तासांच्या आत नेत्रदान केले गेले तरच त्याचा काही उपयोग होऊ शकतो. मृत्यूनंतर नातेवाइक भावनाविवश झालेले असतात. त्यामुळे नेत्रपेढीला नेत्रदानाविषयी कळण्यास उशीर होऊ शकतो. तसे झाल्यास कॉर्नियाचा दृष्टिदानासाठी उपयोग होत नाही. म्हणूनच व्यक्तीच्या मृत्यूनंतर एखाद्या तरी नातेवाइकाने वैचारिक परिपक्वता दाखवून, प्रसंगी थोडा रोषदेखील ओढवून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची तत्परता दाखवायला हवी.महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ३५०० व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करतात. त्यापैकी फक्त १/३ डोळे किंवा कॉर्नियांचा अंध रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी उपयोग होतो. या आकडेवारीकडे अतिशय गांभीर्याने बघायला हवे. नेत्रदान घेताना दात्याची योग्य निवड करणे, मृत्यूनंतर लवकरात लवकर नेत्रदान करता येणे आणि नेत्रदानानंतर डोळे नेत्रपेढ्यांच्या माध्यमातून सुरक्षित ठेवता येणे या तीन बाबींवर नेत्रदानाचा रुग्णांना किती उपयोग होऊ शकतो हे अवलंबून आहे. नेत्रदानाविषयी असलेले गैरसमज दूर करणे हे फार मोठे आव्हान असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले....अन् ६१ वर्षांनंतर दृष्टी मिळालीयवतमाळ येथील ग्रामपंचायतीचे सदस्य असणाऱ्या किसन खामलाआडे (६१) आपल्या अनुभवाविषयी सांगत होते. मला तीन वर्षांचा असताना डोळे आले. त्यानंतर अचानक डोळ््यांचा त्रास उद्भवला आणि त्यातच दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. कोणतेही रुग्णालय जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी जे.जे. रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला. येथे आल्यावर तपासणीनंतर डॉ. लहाने यांनी डोळ्यांच्या वेदना पूूर्ण थांबेल, शिवाय उपचार व शस्त्रक्रियेनंतर दृष्टी येईल, असे सांगितले. नेत्रपेढीत दान स्वरूपात आलेल्या डोळ्याने आयुष्य प्रकाशमय केले. शस्त्रक्रिया होऊन आठवडा उलटला आहे, आता दृष्टी परतते आहे असे डॉक्टरांनी सांगितले. माझी पत्नीही अंध आहे. भविष्यात तिलाही हे जग पाहायचा अनुभव द्यायचा आहे.- किसन खामलाआडे, यवतमाळआमच्यासारख्यांसाठी नेत्रदान करादोन वर्षांपूर्वी जळगाव येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. त्या वेळेस शस्त्रक्रिया अपयशी झाल्याने डोळ्याची दृष्टी गेली. मात्र तरीही खोट्या आशेवर सहा महिन्यांनंतर, एक वर्षानंतर दृष्टी येईल असे वाटत होते. त्यासाठी खूप रुग्णालयांमध्ये फेरफटका मारला, सकाळी उठून रुग्णालयात जायचे आणि पदरी नकार घेऊन यायचा हा जणू दिनक्रम झाला होता. परंतु, त्यानंतर त्या डोळ्यांना वेदना होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दृष्टी नको पण यातना सहन होत नाही, असा विचार करून उपचारांसाठी जे.जे. रुग्णालय गाठले. जे.जे. रुग्णालयात आल्यानंतर डॉ. लहाने यांनी नेत्रप्रत्यारोपणाविषयी सल्ला दिला. आणि एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी व्यवस्थित दृष्टी विकसित होईल असे सांगण्यात आले आहे. असंख्य व्यक्ती दृष्टी मिळावी म्हणून प्रतीक्षायादीत वर्षानुवर्षे आहेत. त्यांच्यासाठी तर प्रत्येकाने नेत्रदान करावे असे वाटते.- रजनीबाई जैन, जळगाव
नेत्रदानाविषयी अधिक जागरूकतेची गरज
By admin | Published: June 10, 2017 1:22 AM