पिंपरी : ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे. अशी संस्कारी पिढी तयार करण्याची देशाला गरज असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला आज त्यांनी भेट दिली. या वेळी समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलमची माहिती दिली. या वेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, गिरीश आफळे, अॅड. सतीश गोरडे, मुख्याध्यापिका पूनम गुजर, रवी नामदे, विलास लांडगे, नितीन बारणे, गतीराम भोईर, शकुंतला बन्सल, मधुसूदन जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. त्या वेळी शिक्षणाची टक्केवारी कमी होती. ही टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. या ठिकाणी हजारो, लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशाचे प्रश्न सुटतील असे वाटले होते; पण आपण केवळ बेरोजगार पिढी तयार करीत आहोत. शिक्षणामुळे अत्याधुनिक पद्धतीकडे आपण गेलो. परंतु शिकून बाहेर पडणाऱ्या पिढीच्या हाताला आणि मेंदूला काम दिले गेले पाहिजे. परंतु त्यांना जेवढ्या संधी प्राप्त करून द्यायला हव्या होत्या, तेवढ्या प्राप्त करून देऊशकलो नाही. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची सध्या गरज आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते शिक्षण भरपूर दिले जात आहे. तंत्रज्ञ निर्माण करतोय, शास्त्रज्ञ निर्माण करतोय, सर्व काही देतोय; पण मूल्यांवर आधारित शिक्षण दिले गेले पाहिजे. या वेळी गिरीश आफळे यांनी मनोगत व्यक्त केले. कल्पना बिचकुले हिने सूत्रसंचालन केले, तर सचिन राठोड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संस्कारी पिढीची देशाला गरज
By admin | Published: October 24, 2016 12:50 AM