लातूर : धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अनुकूल आहेत़ मात्र आईसुद्धा आपल्या मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नसते, ही बाब लक्षात घेवून धनगर समाज बांधवांनी आरक्षण आणि समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी येथे केले़येथील महाराजा यशवंतराव होळकर साहित्य नगरीत आयोजित दुसºया आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाज साहित्य क्षेत्राशी जोडला गेला आहे़ संमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा सफल प्रयत्न होऊ शकतो़आपण सरकारच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न निश्चित करू़ राज्यातील सरकारच्या प्रयत्नामुळेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होत आहे़धनगर समाजाचे आरक्षण, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा विषय हा कोणताही संघर्ष न करता सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही शिंदे म्हणाले़मंचावर संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना़धों़ महानोर, संमेलनाध्यक्ष संगीता धायगुडे, खा़ डॉ़ सुनील गायकवाड, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे आदींची उपस्थिती होती़
धनगर समाज आरक्षणासाठी दबावाची गरज - मंत्री राम शिंदे; आदिवासी-धनगर साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 2:17 AM