- ओंकार करंबेळकर, मुंबई
रे रोड स्थानकाजवळ रेल्वेतून जाताना आपल्यापैकी प्रत्येकाने एक छत्रीवजा लहानसे कारंजे पाहिले असेल. ही आहे लवजी मेगजी पाणपोई. १९२४ साली लवजी मेगजी या कापसाच्या व्यापाऱ्यांनी आपली लाडकी मुलगी कुसुमबाला हिच्या स्मृतीप्रित्यर्थ या पाणपोईची निर्मिती केली होती. काळाच्या ओघात या पाणपोईची दुर्दशा झाली असून मुंबईच्या स्थापत्य व नागरी इतिहासातील एक महत्वाची वास्तू शेवटच्या घटका मोजत आहे.कॉटन ग्रीन, रे रोड परिसरामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे व्यापारी, कामगार एकत्र येत या सर्व लोकांच्या सोयीसाठी लवजी यांनी ही पाणपोई उभारली. बैलगाड्यांमधून येणारे कामगार आणि व्यापारी येथेच घटकाभर विश्रांती घेत. कुसुमबालेच्या स्मृती जपण्यासाठी उभी राहिलेली पाणपोई यासर्व कामगारांची तहान भागवत असे. मालाड स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिवळसर दगडातून ही पाणपोई बांधण्यात आली. (मालाड स्टोन मुंबईच्या बहुतांश महत्वाच्या जुन्या इमारतींमध्ये वापरण्यात आला आहे.) वरती छत्रीवजा घुमट, आठ खांब आणि चार गोमुखे अशी रचना या पाणपोईची आहे. घुमटाच्या खाली पाणपोईच्या मध्यभागी एका कारंजाच्या नळीतून पाणी बाहेर येई हे पाणी गोमुखातून लोकांना पिता येई. या प्रत्येक गोमुखाच्या खाली परळासारखी खोलगट बेसिन्स असून त्यातून सांडणारे पाणी बैल, गायींसाठी खाली सोडले जाई. त्यामुळे कामगारांसह प्राण्यांची तहानही भागत असे. कुसुमबाला या आपल्या लाडक्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ ही पाणपोई लोकांना भेट देत आहे अशा आशयाच्या दगडी पाट्या गुजराती आणि इंग्लिश भाषेतून त्यावर लावण्यात आल्या आहेत.आज मात्र या सुंदर रचनेची पार दुर्दशा झाली आहे. काळाच्या ओघात प्रदुषणामुळे मालाड दगडाचा रंग काळवंडला आहे. मध्यभागीचे कारंजे तुटले असून गोमुखेही भग्नावस्थेत आहेत. घुमटाच्याजवळचा भागही भेगा पडल्यामुळे त्याचे तुकडे पडू लागले आहेत. या भेगांमधून उगवलेली रोपटी एकेकाळी शानदार असणाऱ्या इमारतीची पुरती रया गेली आहे. पावसा-उन्हामुळे होणाऱ्या परिणामात भर म्हणून येथे येणाऱ्या लोकांनीही याचा दुरुपयोग केला आहे. पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीक पिशव्यांनी पाणपोईजवळ मोठ्या प्रमाणात कचरा येथे टाकण्यात येतो. ट्रकचालक किंवा खासगी ट्रॅव्हल बस चालविणाऱ्या लोकांशिवाय येथे इतरांचा फारसा वावर नसतो. मुंबईत मारवाडी, पारशी, गुजराती व्यापाऱ्यांनी अशा उभ्या केलेल्या अनेक पाणपोया आज दुर्लक्षित अवस्थेत असून त्यांना त्यांचे जुने वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याची गरज आहे. समस्यांमधून दुर्लक्षित पाणपोयांची सूटका करण्यासाठी आणि त्यांची स्थिती सर्वांना समजावी यासाठी मुंबई प्याऊ प्रोजेक्टची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थापत्यविशारद राहुल चेंबूरकर, नागरी इतिहासाचे संशोधक राजेंद्र अकलेकर, अभ्यासक नीराली जोशी आणि स्वप्ना जोशी यांचा चमू पाणपोयांची माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रे रोड येथील पाणपोईची दुरुस्ती करणे नक्कीच शक्य आहे. या पाणपोईच्या संवर्धनासाठी रेल्वे, बीपीटी आणि महानगरपालिकेने एकत्र येऊन काम केल्यास अभ्यासकांना आकर्षित करण्याचे ते केंद्र होऊ शकेल. त्याचप्रमाणे या पाणपोईचा इतिहास सांगणारी पाटी येथे लावता आली तर तिचे महत्व व इतिहास सर्वांना समजू शकेल असे मत या चमूने व्यक्त केले. त्या काळची समाजव्यवस्था, स्थापत्यकला, यापाराची पद्धती या सर्वांचा अभ्यास पाणपोईद्वारे करता येईल असेही या अभ्यासकांनी लोकमतकडे मत मांडले.