पुणे : देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून, सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्कारक्षम नेतृत्वाबरोबरच कुशल मन्युष्यबळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी रविवारी येथे केले.दिवंगत वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असून, शेती व्यवसाय सहकार चळवळीवर अवलंबून आहे. त्यामुळे सहकार चळवळ अधिकाधिक सक्षम करण्याची गरज आहे. गेल्या ७० वर्षांत गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत. मात्र, गरिबांना श्रीमंतांच्या बरोबरीने घेऊन जाण्यासाठी केंद्र शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.कृषी क्षेत्रात सुधारणेसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक व तुषार सिंचनावर भर देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. जगातील कोणताच देश पूर्णपणे कॅशलेस होऊ शकत नाही. देशात पूर्णपणे कॅशलेस व्यवहार होणार नाहीत, परंतु कमीत कमी रोकडवर आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकार क्षेत्रानेही त्यात मोठे योगदान देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव म्हणाले, ‘तरुणांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)
सहकार चळवळ बळकट करण्याची गरज
By admin | Published: January 16, 2017 6:01 AM