ऑनलाइन लोकमतकल्याण , दि. 20 - डॉक्टरांवरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी लोकसभेत केली.धुळे येथे गेल्याच आठवड्यात जिल्हा रुग्णालयात डॉ. रोहन म्हामुणकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत डॉ. म्हामूणकर यांच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्यांची दृष्टी जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी लोकसभेत शून्य प्रहरात औचित्याच्या मुद्द्याद्वारे या महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले.महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत डॉक्टरांना मारहाण होण्याच्या ५०च्या आसपास घटना घडल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार किमान ७५ टक्के डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. भारतात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून आजघडीला किमान ५ लाख अतिरिक्त डॉक्टरांची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार एक हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे प्रमाण असायला हवे, पण भारतात ते दोन हजार रुग्णांमागे एक इतके कमी आहे. ग्रामीण भागात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर तिथे सेवा बजावण्यासाठी जाण्यास तयार नसतात. डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे उपलब्ध डॉक्टरांवर कामाचा प्रचंड बोजा असून त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढीस लागत असल्याकडे खा. डॉ. शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायद्याची गरज
By admin | Published: March 20, 2017 8:38 PM