भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या मागे चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे. त्यामुळे केंद्राच्या अत्याचाराविरोधात आता इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर सुरू आहे हेच सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले, असं पटोले म्हणाले. तसेच संजय राऊत सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात वावगे काय, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला असून राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहेत. याला भाजपाचे नेते पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपाचा राज्यात धार्मिक दंगल घडविण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.