आळंदी : राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती विचारात घेऊन राज्य शासनाने पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेची गरज आहे. या योजनेमागचा हेतू उदात्त असला तरी आळंदीत ही योजना होत नसल्याचे दिसून येत आहे. खेड उपविभागातील प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आळंदी परिसरात यातील कामे न घेतल्याने हा परिसर जलयुक्त शिवारच्या कामापासून वंचित राहिला आहे. यातून येथील पाझरतळी, ओढे, नाले खोलीकरण-रुंदीकरण अभावी तसेच वापराविना पडून आहेत.राज्य शासनाने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम प्रभावी कामकाजापासून वंचित राहात आहे. यात आळंदी मंडल परिसरात फारशी कामे प्रस्तावितदेखील केली नसल्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे. जलयुक्त शिवाराच्या कामातून या परिसरातील भूजल पातळी उंचावण्यात मदत होणार होती. शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या अनेक गावांतून हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येत आहे. मात्र आळंदी परिसरातदेखील उर्वरित भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला जाण्याची गरज असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.जलयुक्त शिवारला शक्ती मिळण्यासाठी या उपक्रमात अशासकीय संस्था, कंपन्या आणि लोकसहभागावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास आळंदी परिसरातील गायरान जागेतदेखील शेत शिवार हिरवेगार होण्यास मदत होणार आहे. बंधारे आणि धरणांच्या पाण्यामध्ये होणारी घट, कमी होत चाललेले जलस्रोत यामुळे जिल्ह्यात येत्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. पिण्याच्या पाणीप्रश्नामुळे अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, या समस्येवर उपाय जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ योजनांच्या कामाला गती आणि प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे. आळंदी परिसरातील आदिवासी भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागत आहे. यासाठी राज्य शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली आहेत. त्याप्रमाणे आळंदी परिसरात कामे सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे काही ठिकाणी पाणीसाठा झाल्याने पाणीटंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अधिकचा पाणीसाठा होणार आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे. काही ठिकाणी नियोजनाअभावी कामे रखडली आहेत.(वार्ताहर)आळंदी मंडळ परिसरातील प्रस्ताव प्राप्त नाही, मंडळ विभागातून प्रस्ताव आल्यास तत्काळ कामकाज सुरु करण्यात येईल. येत्या महिना भरात यावर योग्य आढावा घेण्याात येईल. -हिम्मतराव खराडे, प्रांत अधिकारीखेडमधील आळंदी मंडल कार्यक्षेत्रात ११च्यावर गावे आणि अनेक ठिकाणी पाझर तलाव, ओढे-नाले, नदी किनाऱ्यालगत खोलीकरण जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आली नाहीत. अनेक ठिकाणी शेत शिवार रस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्तेदेखील प्रभावी कामकाजापासून वंचित असल्याने आळंदी परिसरात वाहतुकीची कोंडीने नागरिक-भाविक त्रस्त आहेत. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास आणि कामात प्रशासनाने लोकसहभाग घेतल्यास आळंदी परिसर विकासापासून वंचित राहणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेची गरज
By admin | Published: May 18, 2016 1:23 AM