निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:38 PM2019-10-03T14:38:26+5:302019-10-03T14:39:20+5:30
राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत असताना बंडखोरीचे गृहन जवळजवळ सर्वच पक्षांना लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी पलायन केले आहे. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हीच स्थिती विरोधी पक्षांसोबत निवडणूक झाल्यानंतरही होऊ शकते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर आमदारांना पक्षात टीकून ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर असणार आहे. किंबहुना अशाच नेत्यांचा शोध आघाडीला आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कुमारस्वामी यांचे सरकार पाडले. 10 हून अधिक आमदारांनी यावेळी बंडखोरी केली होती.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तिच स्थिती यावेळी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला मित्र पक्षाची मदत लागणारच आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास, पुन्हा बंडखोरीला ऊत येऊ शकतो. या स्थितीपासून वाचण्यासाठी उमेदवारी देतानाच पक्षांशी निष्ठा ठेवून राहितील अशा नेत्यांनाच तिकीट देण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांकडे आहे.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे. त्यामुळे उमेदवारी देतानाच याची काळजी घेण्याचे शिवधनुष्य आघाडीला पेलावे लागणार आहे.