पुणे : घरात एक मतिमंद मुलगा. तो सैरभैर झालेला. त्याला कळत नाही आजूबाजूला काय चाललं आहे, का चाललं आहे. त्याला रोज फिरायची सवय आहे. ती त्याची गरज आहे.त्याला मी समजावू शकत नाही. मला फार हताश वाटतं. आपण एकमेकांशी बोलतो. मित्रांना फोन करतो. त्याने काय करावं. त्याची घुसमट कुणाला समजणार आहे? हे भावनिक बोल आहेत राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे. लॉकडाऊनच्या काळातील आयुष्यावर प्रकाशझोत टाकणा-या 'लॉकडाऊन डायरी' चे हे पहिले पान त्यांनी मुलाला केंद्रस्थानी ठेवून 6 जुलै ला सोशल मीडियावर शेअर केले होते. गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि आता ही डायरी अपूर्णच राहिली. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कार्यरत असताना वेळप्रसंगी कणखर भूमिका घेतलेल्या नीला सत्यनारायण यांच्या मातृत्वाचा एक हळवा कोपरा या शब्दांमधून प्रतीत झाला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच लॉकडाऊनच्या काळात सामना कराव्या लागणाऱ्या अडचणींना त्यांनी लेखणीतून वाट मोकळी करून दिली होती. ' लॉकडाऊन डायरी' मधून त्यांनी विशेष मुलाच्या भावनिक घुसमटीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आहे अशा आशयाचे मुखपृष्ठ त्यांनी त्या डायरीच्या पहिल्या पानाला जोडले होते. त्यामध्ये 'जवळ जवळ तीन महिने झाले लॉकडाऊनला. आधी भाजीपाला मिळायचा. वाण सामानही मिळायचं. आता तेही मिळेनास झालं आहे. कोणाकोणाला विनंती करून हे सामान मागवलं. दूर जायचं म्हटलं तर गाडी हवी.बस तर बंदच आहे. बाहेर जायचं म्हटलं तर पोलिसांची भीती. ते आपला अपमान करतील.गाडी जप्त करतील याची धास्ती. अशा शब्दातून त्यांनी लॉकडाऊनमधील सामान्य माणसाचे जगणेही मांडले होते. मात्र त्यांच्या निधनाने ही डायरी आता अपूर्णच राहिली...याची सल अनेकांना जाणवत आहे.
नीला सत्यनारायण यांच्या मनातील 'घुसमट' आली समोर; लॉकडाऊन काळात लिहीत होत्या 'डायरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 11:50 AM