मुंबई : प्रसार भारतीने पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग इतरत्र न हलवता, ते जेथे आहे तिथेच सुरू ठेवावे. पुणे येथील कार्यालयात वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
तब्बल सात दशके आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र प्रसारित केले जाते. सुमारे २.४ दशलक्ष श्रोतावर्ग याचा लाभ घेत आहेत. हा विभाग बंद झाल्यास श्रोत्यांची गैरसोय होईल. पुणे विभागाने अडचणीच्या काळात देखील उत्कृष्ट काम करून दाखवलेले आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
यापूर्वीदेखील, पुणे आकाशवाणी केंद्रावरील स्थानिक कार्यक्रम रद्द करून मुंबई केंद्रावरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा प्रसार भारतीचा आदेश तातडीने रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
तसेच, लोकप्रिय आकाशवाणी पुणे केंद्र बंद करण्याऐवजी अधिकाधिक सक्षम कसा होईल याकरिता पूर्णवेळ सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. यासंदर्भात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि राज्यपाल रमेश बैस यांना पत्र देण्यात आले असल्याचेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.