मुंबई: सोशल माध्यमांवरून महिलांना ट्रोलिंग करण्यात येत आहे. तसेच महिलांना बलत्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात सायबर गुन्हे विषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
सोशल मिडीयावर महिलांना ट्रोलिंग करण्याच्या अनके घटना समोर येत आहे. तर बनावट खाते तयार करून महिलांना ट्रोल करून त्यांना धमक्या दिल्या गेल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना दिलेत. तसेच महिला सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सुद्धा यावेळी गोऱ्हे म्हणाल्यात.
सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे. त्याचा परिपूर्ण वापर करावा. सोशल माध्यमांवरून एखाद्या महिलेला, मुलीला धमकी येत असेल तर पोलिसांनी तिच्या तक्रारीची प्रतीक्षा करू नये. स्वत:हून कारवाई करावी असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या ट्विटर आणि फेसबुक हॅण्डलला टॅग करण्याऐवजी पिडीत महिलांनी थेट महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डला टॅग करून तक्रारी कराव्या. सर्व पोलिस दलाने महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डलवर लक्ष ठेवावे व त्यानुसार पुढील कारवाई करावी. धमकी देणाऱ्याचे सोशल खाते खरे असो किंवा बनावट त्याला शोधून काढाच, असेही यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्यात.