Sharad Pawar on Neelam Gorhe : शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे असा आरोप केला होता. यावरुन ठाकरे गट चांगलांच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात? असं म्हटलं. यावर आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे होते यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
साहित्य संमेलनात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा दावा निलम गोऱ्हेंनी केला. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर टीका केली जात आहे. यावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे या गोष्टींबाबत तिथे भाष्य करायला नको होतं असं म्हटलं आहे.
"संजय राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हे यांनी या संबंधीचे भाष्य करायची आवश्यकता नव्हती. या अधिवेशनात सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजेत. त्यांनी तिथे गाडीचा उल्लेख केला. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांच्या चार टर्म झाल्या आहेत. या सगळ्या चार टर्म कशा मिळाल्या आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा एकंदर तिथला सहभाग याची फारशी चर्चा न केलेली बरी. कारण त्यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळात जी एन्ट्री झाली ती प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली. तो कालावधी संपल्यानंतर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. हल्ली असं दिसतंय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये त्या आहेत. म्हणजे एका मर्यातीत काळामध्ये सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं," असं शरद पवार म्हणाले.
"त्यासंदर्भात संजय राऊत जे म्हणतात ते योग्य आहे संमेलनाचे आयोजक आहेत त्यांनी त्याबद्दलची नापसंती जाहीर व्यक्त केली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही. यासंदर्भात साहित्य परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली आहे. मी त्या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे संजय राऊतांना ही जबाबदारी माझ्यावर टाकायची असेल तर मला त्याबद्दल काही हरकत नाही," असंही शरद पवार म्हणाले.