बावडा : इंदापूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा व भीमा या दोन्ही नद्या गेले अनेक दिवसांपासून कोरड्या पडल्याने शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपून चालली आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही तसेच सध्या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा उपलब्ध असूनही भीमा व नीरा या दोन्ही नद्या कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांनी चांगली जोपासलेली ऊस, चारा व इतर उभी पिके धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भीमा नदीवरील टणू, शेवरे व भाटनिमगाव हे तिन्ही बंधारे कोरडे पडल्याने नदीवरील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. चाकाटी ते गिरवी पर्यंतचे सर्व बंधारे गेल्या दीड महिन्यांपासून कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे नीरा नदी काठची पिके जळून चालली आहेत. भीमा व नीरा या दोंन्ही नद्या कोरड्या पडल्याने इंदापूर तालुक्यातील या दोन्ही नद्यावर अवलंबून असण्यार्या नळ पाणी पुरवठा योजनाही अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, भिमा व निरा या दोन्ही नद्यांमध्ये शासनाने भाटघर व उजनी धरणातून पाणी सोडून शेतकरी वगार्ला व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नीरा-भीमा नद्या पडल्या कोरड्या
By admin | Published: March 03, 2017 1:09 AM