नवी दिल्ली - भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १२५ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले अन् तेही सुवर्ण. तांत्रिकदृष्ट्या अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक आहे. त्यामुळे देशाला मोठा आनंद झाला असून अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते नीरजच्या गावाकडेही या विजयाचं सेलिबेशन होत आहे. नीरज हा विजयी सुवर्णक्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे. धावत पळत चपळाईने, अगदी छत्रपती शिवाजी महारांजांच्या मावळ्याच्या ताकदीने नीरजने भालाफेक केल्याचे व्हिडिओत दिसून येते. त्यानंतर, स्टेडियममध्ये केलेला जल्लोष आणि त्याच्या प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा क्षण अत्यानंद देणार आहे. विशेष म्हणजे नीरज चोप्राचे वंशज मूळचे महाराष्ट्रीयन आहेत. त्याच्या पूर्वजांनी काही शतकांपूर्वी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात बालाजी बाजीरावांसाठी तलवार उचलत हरियाणात स्थलांतर केले.
नीरज चोप्रा, त्याच वंशजांपैकी एक. जाट ह्रदयभूमीत स्थायिक झालेला एक लढाऊ रोड मराठा म्हणजे चोप्रा. भाल्याच्या आधुनिक अवताराने नेत्रदीपक परिणामांचा वापर करून नीरजने मराठ्यांचा वारसा पुढे नेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची झलकच त्याच्या चपळाईत आणि भालाफेकीत दिसून येते. त्यामुळेच, मी रोड मराठा असल्याचा मला अभिमान आहे, असे नीरजने 2016 साली एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखती म्हटले होते.
या स्पर्धेतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी, हरयाणाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, ऑलिंपिक विनर राजवर्धन राठोड यांनी अभिनंदन केलं होतं. शिखर धवन, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही मेसेज करुन नीरजचे अभिनंदन केले होते. विशेष म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही त्यांच मेसेजद्वारे कौतुक केलं होतं. शिल्पा शेट्टी अन् कतरिना कैफ यांनीही अभिनंदन केलं होत. मात्र, जेव्हा मी सुवर्णपदक स्विकारलं, त्यावेळी स्टेडियममध्ये वाजलेलं राष्ट्रगीत हा मला सर्वात आनंद देणारा क्षण होता. त्यावेळी, माझ्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते, असे नीरजने म्हटले होते.