मुंबई : देशभरात रविवारी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा पेपर सोपा गेल्याची संमिश्र प्रतिक्रिया विद्यार्थीवर्गाने दिली. मात्र, दुसरीकडे फिजिक्सच्या पेपरने विद्यार्थ्यांना घाम फोडला होता. बायो-केमिस्ट्रीचा पेपर पेपर ठिक होता. तर केमिस्ट्रीचा पेपर अवघड नसला तरी किचकट होता. परिणामी, प्रश्न सोडविण्यास वेळ लागला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी मित्रांनी दिली.देशभरातील वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय (एमबीबीएस/बीडीएस) अभ्यासक्रमासाठीच्या जागांसाठी रविवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी घेण्यात आली. सकाळी दहा वाजता घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये १ लाख ८३ हजार ९६१ विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. नीटसाठी महाराष्ट्रात सहा परीक्षा केंद्रांसह एकूण ३४ केंद्रांना मान्यता देण्यात आली होती. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिजिक्सच्या पेपरने विद्यार्थ्यांना घाम फोडला होता. संख्यात्मक प्रश्नांची संख्या अधिक असल्याने काहींना ते सोडविता आले नाहीत. केमिस्ट्रीचा पेपर तुलनेने सोपा होता. तर बायोच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न काहीसे फिरवून विचारण्यात आले होते. नीट परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठीचा मार्ग मोकळा होतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ जून रोजी या परिक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
नीट परीक्षा : फिजिक्सने फोडला विद्यार्थ्यांना घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:35 AM