ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 8 : राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. जिल्हा मुख्यालयी परीक्षा केंद्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सहज व सुलभतेने परीक्षा केंद्रावर पोहचता येईल, असेही खा. चव्हाण यांनी केंद्रीय मानव विकास व संशोधन मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. नीट परीक्षेचे आॅनलाईन अर्ज जानेवारी महिन्यात भरले जाणार आहेत. तत्पूर्वी नवीन परीक्षा केंद्रांची निर्मिती करुन राज्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी एमबीबीएस, बीडीएस व तत्सम वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षेला बसतात. ही परीक्षा यापूर्वी राज्यपातळीवर होत होती. या परीक्षेचे केंद्र जिल्ह्याचे मुख्यालय होते. त्या ठिकाणच्या विविध शाळा, महाविद्यालयात परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु या वर्षी पहिल्यांदाच एचएच.सीईटी ऐवजी नीट म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर हे सहा परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत.
परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निश्चित स्थळी पोहचण्यास वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करुन सुमारे तीन ते चारशे किलोमीटरचे अंतर पार पाडावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होवून मानसिक व शारीरिक त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या सहा केंद्रा व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा मुख्यालयी किंवा शक्य नसेल तर दोन किंवा तीन जिल्हा मुख्यालय एकत्र करुन परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)